गडचिरोली : पावसाळ्याचे दिवस असल्याने आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या. याशिवाय पूरपरिस्थितीचा फटका बसलेल्या शेतातील पिकांच्या आणि घरांच्या नुकसानीबाबतच्या सर्व्हेक्षणाला गती द्या, अशी सूचना माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी केली. नेते यांनी बुधवारी गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहुल मीना (आयएएस) यांची भेट घेऊन सद्यस्थितीवर चर्चा केली.
काही महिन्यांपूर्वी गडचिरोली आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सोडे या गावातील मुलींच्या वसतिगृहात विषबाधा झाली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आदिवासी आश्रमशाळांमधील स्वच्छता आणि देखरेखीकडे लक्ष केंद्रीत करावे. विद्यार्थ्यांना योग्य आहार, साफसफाई तसेच वसतिगृहात मुला-मुलींची कोणतीही गैरसोय होणार नाही याकडे जातीने लक्ष देण्याची सूचना यावेळी माजी खा.नेते यांनी प्रकल्प अधिकारी मीना यांना केली.
यावेळी पूरपरिस्थितीमधील नुकसानीच्या पंचनाम्यांची स्थिती काय आहे याबद्दलही त्यांनी माहिती जाणून घेतली. राहिलेले पंचनामे लवकर पूर्ण करून रिपोर्ट सादर करा, म्हणजे नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करता येईल, अशीही सूचना यावेळी नेते यांनी मीना यांना केली.