अन् धडधडत आलेल्या मालगाडीने वाघिणीला उडवले, वडसा क्षेत्रातील घटना

अवयव शाबूत, वनविभागाने केले दहन

गडचिरोली : रेल्वेमार्ग ओलांडत असलेल्या एका चार वर्षीय वाघिणीला मालवाहू रेल्वेगाडीने धडक दिल्याने त्या वाघिणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे वडसा वनविभागांतर्गत वडसा परिक्षेत्रातील एकलपूरच्या राखीव वनातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर घडली. वनविभागाच्या पथकाने पंचनामा आणि शवविच्छेदन करून मृतदेहाचे दहन केले.

प्राप्त माहितीनुसार, बल्लारपूर-गोंदिया या रेल्वे मार्गावरून एक मालगाडी धडधडत जात होती. त्याचवेळी गांधीनगर गावानजीक एक चार वर्षीय मादी वाघिण रेल्वेमार्ग ओलांडत होती. रेल्वेच्या गतीचा अंदाज न आल्याने त्या वाघिणीला रेल्वेचे धडक बसली. त्यामुळे जोरदार मार लागून तिचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.कुंदन पोडचलवार, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकिय अधिकारी (वन्यजीव), सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त दीपक मेडीकुंटावार, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.मृणाल टोंगे हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृत वाघाला वडसा परिक्षेत्रातील वडसा येथील रोपवाटिकेत आणण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकिय अधिकारी व त्यांच्या चमुने मृत वाघाचे शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. मृत वाघाचे सर्व अवयव कायम असल्याचे आढळून आले. पंचांच्या उपस्थितीत तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकारणाच्या नियमानुसार मृत वाघाचे दहन करून नष्ट करण्यात आले. संपूर्ण शरीर भस्म होईपर्यंत सर्व अधिकारी व पंच मोक्यावर उपस्थित होते.

ही कार्यवाही उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वनअधिकारी मनोज चव्हाण, आरएफओ विजय धांडे, आरएफओ (वन्यजीव) एम.जी. मेश्राम, संबंधित पशुवैद्यकिय अधिकारी, तसेच एनटीसीएचे प्रतिनिधी अनिल दशहरे यांच्या उपस्थितीत वडसा परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी कराडे, क्षेत्र सहाय्यक तिजारे, आरआरटीचे अजय मराठे, वनरक्षक गजभिये, भोजराम भुरकुंडे, वाहन चालक मनन शेख आदींनी पार पडली.