गडचिरोली : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सामाजिक संस्था व संघटनांची भूमिका काय असावी, किंवा कशी असेल यासाठी सामाजिक कार्यकर्त्या कुसूम अलाम यांच्या निवासस्थानी एक बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्या चर्चेतून काही मुद्दे मांडण्यात आले. सामाजिक संस्था तळागाळापर्यंत जाऊन शासनाच्या योजनेचा, कायदे, वेळोवेळी निघणारे निर्णय, सामाजिक जनजागृतीचे कार्य करीत असतात. शासनाची यंत्रणा जिथे पोहोचू शकत नाही तेथे एनजीओ, संस्था, संघटना पोहचतात. मात्र या सरकारच्या काळात सीएसआर सारखे फंड बंद केले. संघटना इश्यूबेस काम करतात, पण पैसा नसल्याने ताकद राहिली नाही असा सूर या बैठकीत व्यक्त झाला.
अंनिसने सेवाग्राम आश्रमाला महाराष्ट्र बचाव, संविधान बचाव संदर्भात दोन सभा घेतल्या. तिथे महाविकास आघाडी समर्थनार्थ प्रशिक्षण दिले. काँग्रेसने योग्य उमेदवाराला संधी दिली पाहिजे. गधे-घोडे देणे बंद करावे. विकासाची कास धरणाऱ्याला तिकीट दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची राजकीय पक्षांची तयारी दिसते. लोकप्रतिनीधी हा जनतेचा सेवक असावा. सामाजिक संघटना, संस्था मजबूत बनण्यासाठी धोरण तयार केले पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते वाणी यांनी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केली. एनजीओ लोकशाहीचा पाचवा म्हणजे मधला खांब आहे, याकडे दुर्लक्ष होत आहे, असे चर्चेदरम्यान सांगण्यात आले.
यावेळी अंनिसचे मनोहर हेपट, विलास निंबोरकर, विठ्ठलराव कोठारे, गोविंदराव ब्राम्हणवाडे, लहुजी रामटेके, हरिदास कोटरंगे, आम्ही आमच्या आरोग्यासाठीचे प्रतिनिधी संदीप लाडे, आदिवासी संघटनांचे स्वप्नील मडावी, ग्रामसभेच्या कार्यकर्त्या छाया कोल्हे, ह्रदय सामाजिक संस्थेचे के.डी देवगडे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवरही चर्चा झाली. सर्वांच्या भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांना हे कळविण्याचा निर्णय घेण्यात आला.