शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांची भेट ठरली जि.प.शाळेसाठी प्रेरणादायी

थाटेबोडी अचानक भेट व तपासणी

गडचिरोली : पर्यवेक्षीय अधिकारी शाळेला भेट देणार म्हटल्यावर शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढते. पण शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांची आकस्मिक भेट आरमोरी पं.स.अंतर्गत थाटेबोडीच्या शाळेसाठी प्रेरणादायी ठरली आहे. शिक्षक व पालकांमध्ये मिसळून आनंददायी व खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करून समस्या समजून घेऊन मार्गदर्शन केले तर ते सर्व घटकांसाठी अधिक परिणामकारक, फलदायी व प्रेरणादायी ठरते याची प्रचिती थाटेबोडी येथील शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांना आली.

विद्यार्थी विकास महाअभियानांतर्गत आरमोरी पंचायत समितीअंतर्गत पिसेवडधा केंद्रातील थाटेबोडी येथील शाळेला शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी अकस्मात भेट देऊन शाळेतील सर्व बाबींची तपासणी केली. यात प्रत्येक विद्यार्थ्याची, वर्गाची व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीच्या निकषावर पडताळणी केली. शाळेत दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची स्वत: चव घेतली व शाळेने विकसित केलेल्या परसबागेची पाहणी केली. पॅट, नॅस व असर या संबंधाने आढावा घेतला. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकातील कोऱ्या पानांचा वापर व प्रभावी अंमलबजावणी याची माहिती घेतली. लोकसहभागातून शाळेत निर्माण केलेल्या सुविधा व शाळेतील भौतिक सुविधा, तसेच आनंददायी गोष्टीचा शनिवार उपक्रम याविषयी माहिती जाणून घेतली.

या सर्व बाबीची तपासणी करताना शिक्षणाधिकारी पवार यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचेवर कोणताही ताण-तणाव येऊ न देता आनंददायी व खेळीमेळीचे वातावरणात कायम ठेवले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळा राबवित असलेल्या कार्यक्रमांचे व उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत काही मार्गदर्शक सुचना केल्या. शाळेत वाढलेली पटसंख्या, शालेय दप्तर अद्यावत ठेवून शाळेने लोकसहभाग वाढविल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. शाळा विकासासाठी व भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी त्यांनी गावचे सरपंच बालाजी गावडे व उपसरपंच गेमराज टेंभुर्णे यांचेशी चर्चा केली. यावेळी शाळेतील शिक्षक, पालक व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

अशा भेटी वारंवार व्हाव्यात

शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी आमच्या शाळेला दिलेली भेट म्हणजे पर्यवेक्षणाची व्याख्याच बदलून टाकणारी ठरली आहे. शाळा तपासणी करताना त्यांनी विद्यार्थी, शिक्षक यांचेवर कोणताही दबाव वा भीती निर्माण होऊ दिली नाही. उलट अशा भेटी वारंवार होत राहाव्यात, असे वाटून गेले. त्यांची ही भेट शाळा विकास व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी उर्जा व प्रेरणा देणारी ठरली, अशी भावना शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर मसराम यांनी व्यक्त केली.