गडचिरोली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरूवारी स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर घरोघरी तिरंगा अभियानाचे औचित्य साधून गडचिरोलीत महायुतीमधील घटक पक्षांच्या वतीने तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. आतिषबाजी आणि डीजेवर वाजणारे देशभक्तीपर गीत, सोबत वंदे मातरम्, भारत माता की जय असा जयघोष करत निघालेल्या या तिरंगा रॅलीने वातावरण देशभक्तीमय केले होते.
या तिरंगा बाईक रॅलीत माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, मा.आ. डॉ.नामदेव उसेंडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत जंबेवार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी मोर्चाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, प्रदेश चिटणीस रेखा डोळस, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
देशभक्तीपर जयघोषात ही रॅली इंदिरा गांधी चौकातून तिरंगा ध्वज हातात घेऊन व बाईकला ध्वज बांधून निघाली. शिवाजी महाविद्यालय, रेड्डी गोडाऊन, चामोर्शी रोड, भाजप कार्यालय, आठवडी बाजार, कारगील चौक, सराफा दुकान लाईन मार्गे पुन्हा इंदिरा गांधी चौकात आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.