गडचिरोली : देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यात पोलीस दलाच्या पुढाकाराने अतिसंवेदनशिल आणि दुर्गम क्षेत्रातील गावांध्येही तिरंगी झेंडा फडकवत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यासाठी पोलिस पथकांनी तब्बल 55 किलोमीटरची पायपीट करत हे अभियान यशस्वी केले.
पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 17 पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक, तर एका पोलीस अधिकाऱ्याला गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले होते. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात त्या पदक विजेत्यांचा प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच पोलीस अधीक्षकांनी शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
दरम्यान एटापल्ली तालुक्यातील कोईनगुडा या गावातील जि.प.शाळेचे शिक्षक आजारी असल्याने त्या शाळेत तिरंगा ध्वजारोहण झाले नाही. त्यामुळे त्या शाळेवर नक्षलवाद्यांनी काळा झेंडा फडकविल्याची चर्चा परिसरात होती. मात्र तसे काहीही झाले नसून नागरिकांनी गैरसमजातून तसा अंदाज व्यक्त केल्याचे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांनी ‘कटाक्ष’सोबत बोलताना स्पष्ट केले.
अतिदुर्गम, नक्षलग्रस्त गावांतही फडकवला तिरंगा
विशेष बाब म्हणजे भामरागड उपविभागांतर्गत पेनगुंडा या गावात उपविभागीय पोलीस अधिकरी अमर मोहिते यांच्या नेतृत्वात धोडराज पोलीस स्टेशनचे पथक, दोन सी-60 चे पथक तथा एका सीआरपीएफ पथकाने 20 किमी पायी अभियान करत गावात ध्वजारोहण केले. तसेच अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन नारगुंडा पार्टी, 02 सी-60 पथक व 01 सीआरपीएफ पथक यांनी 35 किमी पायी अभियान राबवत माओवादग्रस्त अतिसंवेदनशील अशा कत्रंगट्टा येथे भेट दिली. तसेच गावकऱ्यांसोबत ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिन साजरा केला.
दि.13 मे 2024 रोजी याच कत्रंगट्टा गावाच्या जंगलात माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये एक डीव्हीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एक कंपनी सदस्य व एक दलम सदस्य अशा एकुण 3 जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात व माओेवादयांच्या संपुर्ण पेरमिली दलमचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले होते.
माओवादी अशा अतिदुर्गम गावांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काळे झेंडे फडकविण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र गडचिरोली पोलीस दलाने त्यांचे मनसुबे उधळून लावत आज दुर्गम-अतिदुर्गम भागांमध्ये व विविध पोस्ट / उपपोस्टे/ पोलीस मदत केंद्र येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. तसेच अतिदुर्गम भागातील नागरिकांनी हरघर तिरंगा मोहिमेमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला. यासोबतच गेल्या एका वर्षभरात नव्याने उभारलेल्या पोस्टे वांगेतुरी व पोमकें गर्देवाडा या ठिकाणी गावकयांनी पोलीस दलासोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला.
पोस्टे वांगेतुरी व पोमकें गर्देवाडा येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अतिदुर्गम भागातील युवकांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. सोबतच विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्हयात विविध पोस्टे/ उपपोस्टे/ पोमकें स्तरावर अतिदुर्गम भागांमध्ये गावकयांच्या सहभागाने राष्ट्रध्वजासोबत मिरवणुका काढल्या. यासोबतच पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश यांच्या हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम झाला.