गडचिरोली : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने गटसाधन केंद्र धानोराअंतर्गत इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीला शिकविणाऱ्या शिक्षकांची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण कार्यशाळा घेण्यात आली. गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात ही कार्यशाळा पार पडली.
आठवी व दहावीच्या शिक्षकांची एकदिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळा शुक्रवारला तर तिसरी व पाचवीच्या शिक्षकांची कार्यशाळा शनिवारला पार पडली. उद्घाटन प्राचार्य विजय सुरजुसे यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षणार्थी शिक्षकांना राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाचे तालुका समन्वयक मधुकर सहारे, सुलभक देवेंद्र लांजेवार, मंगेश गद्देवार, ए.जी. वेलादी, प्रशांत साळवे, संगीता भडके यांनी मार्गदर्शन केले.
तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीला शिकविणाऱ्या सुमारे २०० शिक्षकांचा यात सहभाग होता. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची जिल्ह्याची सद्यस्थिती, निकाल कसा तयार करतात, 2021 च्या निकालाचे विश्लेषण, गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणामध्ये का मागे आहे? याचे चर्चात्मक विश्लेषण, गुणवत्ता उंचावण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, अध्ययन निष्पत्ती व अध्ययन अनुभव यांची सांगड, अध्ययन निष्पत्तीची ओळख राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणावर आधारित प्रश्न कसे तयार करावे, याबाबत कृतीपूर्ण आदर्शीकरण करण्यात आले.
संचालन संगीता भडके यांनी तर शर्मिष्ठा धाईत यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सुधीर शेंडे, प्रशांत तोटावार, दुर्वास ठाकरे आदीसह उपस्थित शिक्षकांनी सहकार्य केले.