गडचिरोली : प्लॅटिनम ज्युबिली शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाने खेळाच्या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी 2022-23 आणि 2023-24 या शैक्षणिक वर्षात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. याचीच पावती म्हणून शाळेला प्रोत्साहन अनुदान प्रदान करण्यात आले. गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या विशेष समारंभात शाळेला हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे महत्त्व केवळ अनुदानात नसून, हा सन्मान विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व शिक्षकांच्या अविरत मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या अमुल्य पाठिंब्याचे प्रतीक आहे. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ शरीरसंपदा नाही, तर शिस्त, चिकाटी आणि आत्मविश्वासही कमावला आहे, अशी भावना ‘प्लॅटिनम’चे महासचिव अजिज नाथानी यांनी व्यक्त केली.
यासोबतच शाळेचे योग शिक्षक अनिल निकोडे यांना जिल्ह्यात सर्वोत्तम योग शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या सर्वांगीण विकामासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षणीय आहे. तसेच शाळेचे बॉक्सिंग प्रशिक्षक यशवंत कुरुडकर यांनाही जिल्ह्यात सर्वोत्तम बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी बॉक्सिंग क्षेत्रात चमकले आहेत.
प्राचार्य रहीम अमलानी, समन्वयक पारस गुंडावार यांनी या गौरवाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना, या यशामुळे शाळेची प्रतिष्ठा अधिकच उंचावली आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि समर्पणातून मिळवलेले हे यश प्रेरणादायक आहे. शाळेने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही उंची गाठली आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, भविष्यातील क्रीडा स्पर्धांसाठी आम्ही उच्च ध्येय निश्चित केले आहे, अशी प्रतिक्रिया दिली.