गडचिरोली : बनावट पुरावे देऊन जात प्रमाणपत्र मिळवल्याचा ठपका ठेवत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (आरमोरी क्षेत्र) सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. ज्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी यापूर्वी निवडणूक लढली ते जात प्रमाणपत्रच रद्द झाल्यामुळे चंदेल यांना राखीव प्रवर्गातून निवडणूक लढण्याचा मार्ग बंद झाला आहे. परिणामी तिकीटासाठी महाविकास आघाडीतून आता आरमोरी मतदार संघावर काँग्रेसचा दावा प्रबळ होणार आहे.
महाविकास आघाडी म्हणून शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. आरमोरी विधानसभा मतदार संघावर एकेकाळी शिवसेनेचे वर्चस्व होते. पण पुढे काँग्रेस आणि आता भाजपने वर्चस्व निर्माण केले. पण या मतदार संघावत शिवसेनेला पुन्हा चांगले दिवस येतील या आशेने शिवसेनेकडून या मतदार संघावरचा आपला दावा कायम ठेवला होता. त्यामुळे यावेळी महाविकास आघाडीतून ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता असताना काँग्रेसमधील अनेक ईच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गट या क्षेत्रात फारसा सक्रिय नसल्यामुळे आणि शिवसेनेकडून प्रबळ दावेदारालाच न्यायालयाने जायबंदी केल्यामुळे ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसच्या कोट्यात जाण्याचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे.
न्यायालयातही चंदेल यांच्याविरूद्ध निकाल
सुरेंद्रसिंह चंदेल यांना अॅाक्टोबर 2019 मध्ये कुरखेडाच्या तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी छत्री या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिले होते. त्या आधारेच त्यांनी गेल्यावेळी विधानसभा निवडणूकही लढली होती. पण जात पडताळणी समितीने नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. त्या निर्णयाला चंदेल यांनी न्यायालयात आव्हान दिले. पण न्यायालयाने जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवण्यात आला. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीनुसार चंदेल यांच्यावर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.