गडचिरोली : पोळा आणि येणाऱ्या गणेशोत्सवासह इतर महत्वाच्या सणांच्या काळात अवैध दारूला आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. अहेरी ठाण्याला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक स्वप्निल ईज्जपवार यांच्या नेतृत्वात कोलपल्ली येथे करण्यात आलेल्या कारवाईत तीन जणांच्या घरांमधून तब्बल 9 लाख 35 हजारांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
सण-उत्सव शांततेचे पार पाडून उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांवर अंकुश ठेवावा, असे आदेश पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिले आहेत. त्यानुसार अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि स्वप्नील ईज्जपवार हे आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना कोलपल्ली येथील देवाजी निला सिडाम (34 वर्षे), दिलीप रामा पोरतेट (28 वर्षे) आणि संपत पोच्चा आईलवार (38 वर्षे) यांच्या घरातून देशी-विदेशी दारुची अवैध विक्री केली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावरून त्यांनी धाड टाकल्या असताना मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळला. त्यात रॉकेट संत्रा देशी दारु, किंगफिशर बिअर, हेवर्ड्स 5000 बिअर, ऑफिसर चॉईस व्हिस्की आदी दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे.
याप्रकरणी पो.उपनिरीक्षक सागर माने यांच्या तक्रारीवरून तीनही आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र ते पोलिसांच्या हाती लागले नाही. ही कारवाई पो.नि.स्वप्नील ईज्जपवार यांच्या नेतृत्वात सपोनि. मंगेश वळवी, पोउपनि. सागर माने, पोउपनि. अतुल तराळे, हवालदार निलकंठ पेंदाम, नायक हेमराज वाघाडे, अंमलदार शंकर दहीफळे, राणी कुसनाके, चालक दादाराव सिडाम यांनी पार पाडली.