गडचिरोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल कॉम्प्लेक्स येथे झालेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत प्लॅटिनम ज्युबिली शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी आर्टिस्टिक, ट्रेडिशनल आणि रिमिक योगासन प्रकारांमध्ये आपल्या कौशल्याचे दर्शन घडवत प्रावीण्य मिळवले. प्लॅटिनमचे हे विद्यार्थी आता विभागीय स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील.
गडचिरोली, वांगेपल्ली, आरमोरी, नवेगाव आणि अहेरी या ठिकाणांहून जवळपास 40 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. 14, 17 आणि 19 वर्षांखालील वयोगटांमध्ये ही स्पर्धा झाली. विजेत्या विद्यार्थ्यांची निवड चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय योगासन स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
प्लॅटिनमच्या या विद्यार्थ्यांनी दाखविली चमक
14 वर्षाखालील मुलींच्या गटात स्वरा चैतु उसेंडी (वर्ग 6) हिने प्रथम क्रमांक पटकावला. सेजल अरविंद कापगते (वर्ग 8) हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तिसऱ्या क्रमांकावर दूर्वा रविंद्र कुडकाचार (वर्ग 7) आणि चौथ्या क्रमांकावर प्रांजली प्रमोद वरगंटीवार (वर्ग 6) यांनी स्थान मिळविले. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात फाल्गुनी सचिन नरुले हिला द्वितीय आणि दीशा प्रदीप बिहानी हिने तृतीय क्रमांक मिळाला.
या सर्व विद्यार्थ्यांनी प्लॅटिनम ज्युबिली शाळेचे योग शिक्षक डॉ.अनिल निकोडे, (एन.आय.एस. कोच) यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव केला. पंच म्हणून डॉ.निकोडे, धनराज कांबळे, विशाल भांडेकर यांनी काम पाहिले. त्यात अनिकेत नैताम यांनी सहकार्य केले.
प्लॅटिनम ज्युबिलीच्या विद्यार्थ्यांनी योगासनात मिळवलेले हे यश शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक वाटचालीसाठी एक पुढचे पाऊल ठरले आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेचे महासचिव अजिज नाथानी यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य रहीम अमलानी, प्रशासकीय अधिकारी राजा नायडू यांच्यासह शिक्षक समन्वयक पारस गुंडावार, निकेशन देउरमले, रोजीना बुधवानी आणि शारीरिक शिक्षक यशवंत कुरुडकर, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम घटाळे आणि उपस्थित पालकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना विभागीय योगासन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.