एकटी असल्याचा गैरफायदा घेत महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

आरोपीला तीन महिन्यांचा कारावास

गडचिरोली : गावाशेजारच्या जंगलात महिला एकटी असल्याचे पाहून गावातल्या एका इसमाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत त्या महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेतील आरोपी जगन्नाथ शिवकुमार बैरागी (36 वर्ष) रा. एटापल्ली (ह.मु. पंदेवाही) याला अहेरीचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन.बावनकर यांनी तीन महीने कारावास आणि दोन हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली.

न्यायालयीन सुत्रानुसार, या घटनेतील पीडित महिला घटनेच्या दिवशी गावाशेजारच्या जंगलात शौचास गेली होती. तिच्या मागावर असलेला आरोपी जगन्नाथही तिच्या मागे गेला. ही बाब लक्षात येताच पीडित महिला घाबरून गेली. ती परत घरी येण्यासाठी निघाली असताना परिसरात दुसरे कोणी नाही ही संधी साधून आरोपीने तिला रस्त्यात अडवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला.

याप्रकरणी आरोपीविरूद्ध एटापल्ली पोलिसांनी भादंवि कलम 341, 354, तसेच अॅट्रॅासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एन.एम.भांडेकर यांनी कामकाज पाहिले.