गडचिरोली : जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना खाणउद्योगात रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याची घोषणा लॉयड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेडने केली आहे. तीन महिन्यांच्या या प्रशिक्षण कालावधीत महिन्याला 5500 रुपये मानधनही दिले जाणार आहे.
कंपनीने कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा करताना सुरजागडपासून 20 किलोमीटर परिसरात असलेल्या गावांमधील तरुणांना सक्षम करण्यासाठी 1500 तरुणांना हे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. या प्रशिक्षणात वेल्डिंग, बार बेंडिंग, स्क्रॅप फोल्डिंग, गवंडी काम या काही मूलभूत कौशल्यांचा समावेश राहणार आहे.
हे प्रशिक्षण 1 आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी बेरोजगारांची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. एओपी (पोलीस मदत केंद्र) आलदंडी येथे 10 सप्टेंबरला, हलेवारा येथे 11 सप्टेंबरला, पिपलीबुर्गी येथे 12 सप्टेंबरला, गट्टा येथे 13 सप्टेंबरला ही निवड प्रक्रिया झाली. आता गर्देवाडा येथे 14 सप्टेंबर आणि वांगेतुरी येथील पोलीस मदत केंद्रात 15 सप्टेंबरला निवड प्रक्रिया होणार आहे. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या युवकांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळणार आहे.
लॉयड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेड गावसमुहांच्या विकास आणि भल्यासाठी कटिबद्ध आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आम्ही मूल्यवान कौशल्ये आणि संधी प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत, जे दीर्घकाळासाठी आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देईल. स्थानिक प्रतिभेत गुंतवणूक करून, आम्ही क्षेत्राच्या शाश्वत विकासात सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न करतो, असे लॅायड्स मेटल्सतर्फे कळविण्यात आले.