लोक बिरादरी प्रकल्पाच्या सहकार्यातून जि.प.शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढणार

शाळा सहयोग कार्यक्रमाची सुरुवात

भामरागड : भामरागड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शाळा सहयोग कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार (एम.ओ.यु.) झाला आहे.

या कराराअंतर्गत, लोक बिरादरी प्रकल्पाच्या वतीने भामरागड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सध्या भामरागड तालुक्यातील मन्ने राजाराम क्लस्टरच्या 9 गावांमध्ये लोक बिरादरी प्रकल्पाचे कार्यकर्ते दररोज सकाळी 7 ते 9 या वेळेत दोन तास नवाचारी पद्धतीने शिकवण्याचे काम करत आहेत. त्यात मरमपल्ली, रेला, मडवेली, गेर्रा, लंकलगुडा, येचली, जोनावाही, सिपनपल्ली आणि मोकेला या गावांचा समावेश आहे.

या वर्गांमध्ये लोक बिरादरी प्रकल्पाचे शैक्षणिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांची मराठी, इंग्रजी आणि गणित विषयातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिकवतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होण्यासोबत त्यांना भविष्यातील शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जाणार आहे.

17 सप्टेंबर रोजी या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेची बॅग, टिफिन, पाण्याची बाटली आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. हे सर्व साहित्य श्रीमती लक्ष्मीबाई देवीदास आमटे चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा यांच्या वतीने भामरागड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आले. या कार्यक्रमाला लोक बिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासणार नाही आणि त्यांना शिक्षणात अधिक प्रगती करता येईल.

सदर उपक्रमासाठी लोक बिरादरी प्रकल्पाचे कार्यकर्ते, शिक्षक आणि पालकांचे सहकार्य मिळत आहे. या उपक्रमामुळे भामरागड तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा मिळेल, असा विश्वास अनिकेत आमटे यांनी व्यक्त केला.