गडचिरोली : विदर्भातील आणि संपूर्ण राज्यातील भाविकांची आस्था असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा बुधवारी मार्कंडा येथे आढावा घेण्यात आला. या कामाला गती देण्यासाठी माजी खासदार अशोक नेते यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीत पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक यांनी हे काम पुरातत्व विभागाच्या नियमावलीप्रमाणेच करावे लागत असल्याने वेळ लागत असल्याचे स्पष्ट केले. त्यावर या कामाला गती देण्यासाठी कुशल कारागिरांची संख्या वाढविण्याची सूचना मा.खा.नेते यांनी केली.
मार्कंडा देवस्थानाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत मलिक यांनी कार्यपद्धती सांगितली. इतर कोणत्याही कामासाठी मनु्ष्यबळ आणि मशिनरी वाढवून ते काम लवकर करता येते, पण हे पुरातन नक्षीकाम असल्याने दगडांवर कोरीव काम करून ते तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित आहे याची खात्री करूनच करावे लागत आहे. या नक्षीकामासाठी मोजकेच कारागीर असल्याने वेळ लागत असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे काम थोडे उशिरा होत असले तरी चांगल्या दर्जाचे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यावर नक्षीकाम करणाऱ्या कारागिरांची संख्या वाढविण्याची सूचना अशोक नेते यांनी केली.
या आढावा बैठकीपूर्वी सर्वांनी कामाची पाहणी केली. दगडांवर नक्षीकाम करण्यासाठी असलेले कारागिर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचे आहेत. त्यांच्या कामाची नेते यांनी प्रशंसा करत कामाला गती देण्यास सांगितले.
यावेळी प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा, मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, नगरसेवक तथा सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, देवस्थानचे सचिव मृत्युंजय गायकवाड, आदिवासी नेते रेवनाथ कुसराम, भाजपचे युवा नेते नरेश अल्लसावार, अमोल आईंचवार, सेविकांत आभारे, देवस्थानचे सहकारी शेंडे, पुरातत्व विभागाचे अधिकारी तसेच कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एप्रिल महिन्यात पुन्हा सुरू झाले काम
गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेले हे मंदिर जीर्णोद्धाराचे काम बऱ्याच दिवसांपासून अर्धवट स्थितीत थांबलेले होते. तत्कालीन खासदार अशोक नेते यांनी दिल्लीत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हे काम पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया केली. त्याचवेळी मंदिराच्या कामाला सुरूवात करण्यावरून हरणघाटचे मुरलीधर महाराज व नागरिक उपोषण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. मात्र अशोक नेते व तत्कालीन जिल्हाधिकारी संजय मिना यांनी हे काम पुन्हा सुरू करण्यासंबंधी प्रक्रिया झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर मुरलीधर महाराज मंदिराच्या आवारातच अन्नत्याग करण्यासाठी बसले होते. पण अशोक नेते यांनी एप्रिल महिन्यात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात केल्याने सर्वांना दिलासा मिळाला. मात्र हे काम संथगतीने सुरू असल्याने त्याला गती देण्यासाठी माजी खा.अशोक नेते यांनी ही बैठक घेतली.