रागाच्या भरात छत्तीसगडमध्ये निघून गेलेल्या दोन बहि‍णींचा लावला शोध

धानोरा पोलिसांनी सुखरूप परत आणले

धानोरा : कौटुंबिक कलहातून वैफल्यग्रस्त झालेल्या दोन तरुण बहि‍णींनी कोणालाही न सांगता छत्तीसगडचा रस्ता धरला. तेथील औंधी या गावात त्यांनी आश्रय घेतला. यासंदर्भात धानोरा पोलिसांना तक्रार मिळताच त्यांनी 24 तासात त्यांचा शोध लावून सुखरूप परत आणले.

प्राप्त माहितीनुसार, धानोरा तालुक्यातील काकडयेली गावातील सीताराम कारू बोगा यांची मोठी विवाहित मुलगी छाया प्रमोद हलामी (33 वर्ष) ही आरमोरी तालुक्यातील वानरचुवा या तिच्या सासरवरून 7 सप्टेंबरला माहेरी आली होती. तेव्हापासून ती माहेरीच असताना दि.20 सप्टेंबरला ती कोणालाही न सांगता लहान बहिण शिला (20 वर्ष) हिच्यासोबत काळी-पिवळी जीपगाडीने धानोराकडे जाताना दिसल्या. पण रात्रीपर्यंत त्या दोघी परत आल्या नाही. नातेवाईक, मैत्रीणींकडे चौकशी केली पण कुठेच त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे शेवटी 24 सप्टेंबरला सायंकाळी वडील सीताराम बोगा यांनी धानोरा पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी आपली यंत्रणा कामी लावून त्या दोघी बहि‍णींबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्या दोन्ही बहिणी छत्तीसगडमधील औंधी येथे असल्याचे त्यांना कळले. विवाहित मुलगी छाया ही रागाच्या भरात गेली असल्याने जीवाचे बरेवाईट करू शकते, असेही त्यांना समजले. त्यामुळे प्रभारी अधिकारी पो.नि. स्वप्निल धुळे यांनी छत्तीसगड पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. तसेच पो.उपनिरीक्षक चैत्राली भिसे, हवा भजनराव गावडे, अंमलदार प्रियंका कावळे, वैष्णवी पालकुर्तीवार यांना तिकडे रवाना करून दोन्ही बहि‍णींचा शोध घेतला आणि त्यांना सुखरूपपणे परत आणले.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पेंढरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.