गडचिरोली : आदिवासीबहुल, आकांक्षित, नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज झाले पाहिजे आणि सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा जिल्हावासियांना मिळाव्या यासाठी माझी धडपड होती. अखेर हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. ही माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी आहे, असे भावोद्गार माजी खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक नेते यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि.8) गडचिरोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन व्हिडीओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून झाले. यावेळी नागपूरमधून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतरही मंत्री ठिकठिकाणावरून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना मा.खा.अशोक नेते यांनी मेडिकल कॅालेजच्या मंजुरीसाठी अशासकीय प्रस्ताव मांडण्यापासून तर केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यापर्यंत केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ज्यावेळी केंद्र सरकारने 24 मेडिकल कॉलेजला मंजुरी दिली होती, त्यात गडचिरोलीचे नाव नव्हते. त्यावेळी मी लोकसभेत तारांकित प्रश्न मांडून (9 डिसेंबर 2022) याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यास आम्ही तातडीने मंजुरी देऊ असे आश्वासन दिले. त्यामुळे केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, आकांक्षित जिल्ह्यात मेडिकल कॉलेज किती महत्वाचे आहे, हे राज्य सरकारच्या निदर्शनास आणुन देत केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली. अखेर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले याचे समाधान आहे.
आता गोरगरीब रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवेसाठी चंद्रपूर किंवा नागपूरला जाण्याची गरज पडणार नाही आणि त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागणार नाही, असे अशोक नेते म्हणाले.