अहेरीत उभारणार शिवरायांचा पुतळा, अनेक वर्षांची मागणी होणार पूर्ण

आज संध्याकाळी भूमिपूजन व महाप्रसाद

अहेरी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कोट्यवधि शिवप्रेमींचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा अहेरी राजनगरीसह परिसरात कुठेही पूर्णाकृती पुतळा नाही. त्यामुळे छत्रपतींचा भव्य पुतळा अहेरी राजनगरीत व्हावा अशी अनेक वर्षांपासून शिवप्रेमींची मागणी होती. ती अखेर पूर्ण होणार आहे. शहरातील शिवाजीनगर, प्रभाग क्रमांक 6 मधील बँक ऑफ महाराष्ट्र समोर या पुतळ्याची उभारणी होणार आहे.

माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते गुरूवारी संध्याकाळी प्रस्तावित पुतळा आणि सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. दुपारी 4 वाजता अहेरी राजनगरीच्या मुख्य चौकातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून अम्ब्रिशराव हे शिवप्रेमींसह मुख्य मार्गाने ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीने शिवाजीनगरातील प्रस्तावित पुतळ्याच्या जागेवर पोहोचतील. त्या ठिकाणी भूमिपूजन झाल्यानंतर महाप्रसादाचेही आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे शहर अध्यक्ष मुकेश नामेवार तथा नगरसेविका दीपाली नामेवार यांनी केले आहे.