देसाईगंजवासियांची तहान मिटणार, नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

4 नवीन टाक्या, 127 किमी पाईपलाईन

देसाईगंज : येथील देसाईगंज नगर परिषदेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान (राज्यस्तर)अंतर्गत 64 कोटी 84 लाख रुपये किमतीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. त्याचा भूमिपूजन सोहळा आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते शिवारी वार्डातील नगर परिषद कन्या शाळेच्या प्रांगणात पार पडला.

याप्रसंगी बोलताना आ.गजबे म्हणाले, सदर योजना मंजूर करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु प्रयत्नांती आपण सदर योजना मंजूर करण्यास यशस्वी झालो. त्यासाठी मुख्याधिकारी, प्रशासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आवश्यक कागदपत्रे व माहिती पुरवून सहकार्य केल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

याप्रसंगी बोलताना प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके म्हणाले, देसाईगंज नगर परिषदेची विद्यमान पाणी पुरवठा योजना फार जुनी असल्याने, शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अपुरी पडत आहे. त्यामुळे देसाईगंज शहराला शुध्द पाण्याचा मुबलक पुरवठा होण्यास अडचण निर्माण झाली आहे. या नवीन प्रकल्पाअंतर्गत देसाईगंज नगर परिषदेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार शासनाने 64 कोटी 84 लाख 79 हजार किमतीची पाणीपुरवठा योजना मंजुर केली आहे.

या नवीन पाणी पुरवा योजनेत शहराच्या विविध भागांमध्ये 4 ठिकाणी नवीन पाणी टाकी उभारण्यात येणार आहे. तसेच संपुर्ण शहरात एकुण 127 कि.मी. नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार असून वैनगंगा नदीवर नवीन जॅकवेल पंप हाऊस, जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. यामुळे सन 2055 पर्यंत देसाईगंज शहरवासीयांना मुबलक प्रमाणात व शुध्द पाणी पुरवठा होणार आहे. सदर प्रकल्प मंजुरीकरिता आमदार कृष्णा गजबे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने त्यांचे नगरपालिकेच्या वतीने डॅा.रामटेके यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष किशन नागदेवे, शालू दंडवते, माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, कोरची नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे, माजी नगरसेवक सचिन खरकाटे, राजेश जेठाणी, नरेश विठ्ठलानी, माजी नगरसेविका आशा राऊत, हेमा कावळे, माजी महिला व बालकल्याण सभापती जि.प.रोशनी पारधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन केंद्रप्रमुख अंबाजी आमनार यांनी केले. कार्यक्रमासाठी कार्यालय अधीक्षक प्रमोद येरणे, लेखापाल अविनाश राठोड, पाणीपुरवठा अभियंता आशिष गेडाम व आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.