गडचिरोली : जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या 10 आणि 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोनपैकी एका रिक्त पदावर डी.एड्.- बी.एड्. अर्हताधारक उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. मात्र तो उमेदवार त्याच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रहिवासी असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 आॅक्टोबर ही असल्याने आजच ईच्छुकांनी पंचायत समितीस्तरावर अर्ज करणे आवश्यक आहे.
शासन निर्णय 23 सप्टेंबर 2024, तसेच शिक्षण सहसंचालक, शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या 7 सप्टेंबर रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार सन 2023-24 च्या संचमान्यतेनुसार 10 आणि 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोनपैकी एका रिक्त जागेवर डी.एड्.- बी.एड्. अर्हताधारक उमेदवाराला तात्पुरत्या स्वरूपात संधी दिली जाणार आहे.
ईच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी 11 आॅक्टोबर 2024 पर्यंत आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र आणि गावातील रहिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व पुरावा सादर करण्याचे आवाहन सीईओ आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी केले आहे.