उमेदवारांना 40 लाखांच्या खर्चाची मर्यादा, 50 हजारावर कॅश बाळगल्यास चौकशी

राजकीय पक्ष, बँकर्स व प्रिटींग प्रेसची बैठक

गडचिरोली : यावेळच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांना 40 लाखांच्या खर्चाची मर्यादा राहणार आहे. याशिवाय एका व्यक्तीला एकावेळी 50 हजारापर्यंत रोख रक्कम जवळ बाळगता येणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम जवळ, वाहनात असल्यास त्याचा हिशेब लेखा समितीकडे द्यावा लागणार आहे. ही रक्कम 10 लाखांपेक्षा जास्त असेल तर आयकर विभागाकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेसंदर्भात राजकीय पक्ष, बँकांचे अधिकारी आणि प्रिंटींग प्रेस मालकांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन त्यांना निवडणूक काळात घ्यावयाच्या दक्षतेची माहिती दिली.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक कालावधीत दैनंदिन झालेल्या खर्चाचा हिशेब उमेदवारांना दररोज देणे आवश्यक आहे. याशिवाय निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संपूर्ण खर्चाचा हिशेब शपथपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आचारसंहितेबाबत माहिती देताना वाहनांचा वापर, प्रचार सभा, लाऊडस्पिकर, राजकीय जाहिराती व अनुषंगिक बाबींसाठी राजकीय पक्षांनी घ्यावयाच्या पूर्वपरवानग्या तसेच निवडणूक खर्चाच्या नोंदी, काय करावे आणि काय करू नये, याबाबतच्या नियमांची माहिती दिली.

बँकांमधील संदिग्ध व्यवहारांवर नजर

निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांना बँकेचे नवीन खाते काढावे लागणार आहे. त्यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून त्याच दिवशी तात्काळ ते सुरू करून द्यावे,असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले. तसेच बँकेत जमा व खर्चाच्या संदिग्ध व्यवहारांबाबत विशेषत: 10 लाखावरील रकमेच्या व्यवहाराबाबत निवडणूक विभागाला तत्काळ अवगत करावे. बँकेची रकम वहन करणाऱ्या वाहनावर विहित क्युआर कोड लावावा. तसेच जीपीएस यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बँकर्सच्या सभेत दिल्या.

प्रिटींग प्रेसला सूचना

राजकीय उमेदवारांचे प्रचार साहित्य छापताना प्रिटींग प्रेस मालकांनी निवडणूक विभागाकडून पूर्वपरवानगी घ्यावी. छापील साहित्यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव असावे. तसेच उमेदवारांकडून छपाईसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची प्रत, प्रकाशित प्रतीची संख्या, याबाबत निवडणूक खर्च समितीस वेळोवेळी माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी प्रिंटींग प्रेसच्या प्रतिनिधींना दिल्या.