गडचिरोली : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मतदार याद्यांपासून मतदान केंद्रांची निश्चिती आधीच झालेली होती. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यात 24 मतदान केंद्र वाढले असून 18 हजार 945 नवीन मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या तीनही मतदार संघांमिळून 8 लाख 19 हजार 570 मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दैने यांनी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाचा तपशील यावेळी दिला. निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाल्यानंतर नामांकन दाखल करण्यास सुरूवात होईल. 29 ऑक्टोबरला शेवटचे नामांकन दाखल झाल्यानंतर त्यांची छाननी 30 ऑक्टोबर रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. प्रत्यक्ष मतदान 20 नोव्हेंबर रोजी आणि मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
351 मतदान केंद्र नक्षलप्रभावित भागात
मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक मतदार संघात 8 याप्रमाणे जिल्ह्यात 24 मतदान केंद्र वाढविण्यात आले आहे. त्यानुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात 310, गडचिरोली क्षेत्रात 362 तर अहेरी क्षेत्रात 300 असे एकूण 972 मतदान केंद्र राहणार आहेत. जिल्हाभरात 351 केंद्र नक्षलप्रभावित क्षेत्रात राहणार आहेत. त्यात संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल केंद्र आहेत. त्या केंद्रांवर सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि इतर केंद्रीय सुरक्षा दलांचे जवान तैनात राहणार आहेत. जिल्हाभरात 110 कंपन्यांमधून 17 हजार जवान निवडणूक बंदोबस्तासाठी राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
28 ऑक्टोबरपर्यंत करा नवीन मतदारांची नोंदणी
जिल्ह्यात सध्या 8 लाख 19 हजार 570 मतदार असून त्यात पुरुष 4 लाख 11 हजार 384, तर महिला मतदार 4 लाख 8 हजार 132, याशिवाय इतर (तृतीयपंथीय) 9 मतदारांचा समावेश आहे. आरमेारी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 62 हजार 168, गडचिरोली मतदारसंघात 3 लाख 6 हजार 417, तर अहेरी मतदारसंघात 2 लाख 50 हजार 985 मतदार आहेत. जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांमध्ये पुरूष 9639 आणि स्त्री 7549 व इतर 1 अशी एकूण 17 हजार 189 मतदार आहेत. तसेच दिव्यांग मतदारांची संख्या 6012 इतकी आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत मतदार म्हणून ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येणार असून त्यांची पुरवणी यादी तयार करून त्यांना या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळणार आहे.
तक्रार करण्यासाठी सी-व्हिजिल अॅप
निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहिता उल्लंघन झाल्याची तक्रार नोंदवायची झाल्यास सी-व्हिजिल या ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविता येऊ शकेल. अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत त्या निकाली काढण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करण्यासोबत संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
राज्य सीमेवर नाकाबंदी, 5 हेलिकॅाप्टरची मागणी
यावेळी माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, विविध दलांचे सुमारे 17 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात राहणार आहेत. यादरम्यान 750 कि.मी. रोड ओपनिंग करण्यात येणार असून संवेदनशील क्षेत्रात मतदान कर्मचारी आणि साहित्य पोहोचविण्यासाठी 5 हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. तसेच मतदारांना प्रलोभन देण्यासाठी दारू, पैसे यांची वाहतूक रोखण्यासाठी छत्तीसगड आणि तेलंगना राज्य सीमेवर नाकाबंदी करून 11 तपासणी नाके कार्यान्वित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.