मोबाईल टॉवरच्या बॅटरी व मशीनरी चोरणाऱ्या चार आरोपींना अटक

मोबाईल कंपनीतच होते कार्यरत

गडचिरोली : अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाच्या भागात असलेल्या मोबाईल टॅावरवरील बॅटऱ्या आणि मशिनरीज चोरून नेणाऱ्या चार आरोपींना गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. यातील दोन आरोपी चंद्रपूर तर दोघे गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

भारत सरकारने मोबाईल सेवा पुरविणा­ऱ्या विविध कंपन्यांच्या मदतीने मागील काही वर्षात ठिकठिकाणी टॉवर उभारुन मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून दिले. परंतू हे मोबाईल टॉवर अतिदुर्गम व जंगल परिसरात असल्याने तेथे फारसा कोणाचा वावर नसतो. त्या मोबाईल टॉवरवरील बॅट­ऱ्या व किमती मशिनरीज चोरीचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले होते. साहित्य चोरी गेल्यानंतर ते टॉवर पुर्ववत करण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने मोबाईल नेटवर्क ठप्प होऊन सामान्य जनतेस त्रास सहन लागत होता.

या चोऱ्यांचे प्रमाण लक्षात येताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर चोरट्यांना जेरबंद करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. चोरट्यांचा माग घेत असताना मोबाईल टॉवरमधील बॅटरी चोरी करणाऱ्या व किमती मशीनरीजची चोरी करणाऱ्या व्यक्ती मोबाईल कंपनीमध्येच नोकरीला किंवा नोकरी सोडून या प्रकारच्या चोऱ्या करीत असल्याचे निदर्शनास आले. सदर माहितीची शहानिशा करून आरोपी उमेश दिलीप मेश्राम, (30 वर्ष, रा.पांढरकवडा), सध्याचा पत्ता आशीर्वाद नगर गडचिरोली, चोरीचा माल घेणारे वसीम अख्तर अब्दुल नजीर (39 वर्ष, रा.हॉस्पीटल वार्ड, जटपुरा गेट, चंद्रपूर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 2 लाख 87 हजार हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

मोबाईल टॉवरमधील बॅटरी चोरी करणारे मंगेश नथ्थुजी निकोडे (31 वर्ष), रा.चिरोली ता.मुल यास मुल येथुन व प्रफुल मनोहर लोनबले (24 वर्ष), रा.जेप्रा ता.जि. गडचिरोली यांस जेप्रा येथुन ताब्यात घेतले.

आरोपी दिलीप मेश्राम याने मौजा वैरागड, गडचिरोली, कोनसरी, धानोरा, चामोर्शी, डोंगरसावंगी, गडचिरोली कॉम्प्लेक्स परिसरातील मोबाईल टॉवरवरील मशीनरीज, तर आरोपी मंगेश आणि प्रफुल्ल याने मौजा विक्रमपूर व अनकोडा येथील मोबाईल टॉवरमधील बॅट­ऱ्या चोरल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्यांना आष्टी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत व राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार सतीश कत्तीवार, अकबर पोयाम, पोलीस अंमलदार श्रीकांत बोईना, श्रीकृष्णा परचाके, नामदेव भटारकर, प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे, राजु पंचफुलीवार, दीपक लेनगुरे, संदीप मेश्राम यांनी केली.