गडचिरोली : माहेरी गेलेल्या पत्नीला सासरी नेण्यावरून झालेल्या वादात सासरा आणि साळ्याने जावयावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची हत्या करण्याची घटना अहेरी तालुक्यातील मरपल्ली या गावात घडली. शंकर पोशालू कांबळे (रा.व्यंकटरावपेठा, ता.सिरोंचा) असे मृत जावयाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी सासरा आणि साळ्याला पोलिसांनी अटक केली. ते 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत (पीसीआर) आहेत.
पोलीस सूत्रानुसार, मृत शंकर कांबळे याला दारूचे व्यसन होते. त्यातून पती-पत्नीचे पटत नव्हते. या दाम्पत्याला एक मुलगीही आहे. मात्र पतीच्या स्वभावामुळे आणि व्यसनामुळे शंकरची पत्नी त्रस्त झाली होती. त्यातूनच त्यांच्यात वाद होऊन ती माहेरी निघून जात होती. यावेळी मात्र तिने माहेरी आल्यानंतर सासरी जायचेच नाही असे ठरविले होते. तिचे वडील आणि भावानेही तिला शंकरच्या घरी जाण्यास मज्जाव केला होता.
घटनेच्या दिवशी रात्री शंकर पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासरी आला होता. पण सासरे पेंटा पोच्या कुमरी आणि साळा सुखराम यांनी विरोध केल्याने जावई शंकर कांबळे याच्याशी त्यांचे भांडण झाले. यातच रागाच्या भरात दोघांनी शंकर याला मारहाण केली. एवढेच नाही तर कुऱ्हाडीने डोक्यावर वार केल्याने शंकर रक्ताच्या थारोळ्यात पडून गतप्राण झाला.
मरपल्ली पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर 4 दिवसाचा पीसीआर मिळाला.