ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार, चौकीदार म्हणून करत होता काम

चामोर्शीत स्पिडब्रेकर लावण्याची मागणी

चामोर्शी : शहरातून जाणाऱ्या आष्टी ते मूल मार्गावरील स्टेट बँकेजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत एका सायकलस्वाराचा मृत्यू झाला. मलेश भिमन्ना कनकुटलावार (65वर्ष)रा.चामोर्शी असे मृताचे नाव आहे. ते येथील गांधी राईस मिलमध्ये चौकीदारीचे काम करत होते.

प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगड पासिंगचा ट्रक (क्रमांक सीजी 07, सीआर 7299) आष्टीकडून येत असताना कनकुटलावार हे सायकलसह त्या ट्रकच्या चाकात सापडले. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जड वाहनांची वर्दळ पाहता आष्टी कॅार्नर ते जुने लक्ष्मी गेट चौकादरम्यान स्पिडब्रेकर देऊन वाहतूक नियंत्रक पोलिसाची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.