जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुतन्ना पेंदाम यांचे आकस्मिक निधन

धर्मरावबाबांसह अनेकांच्या शोकसंवेदना

अहेरी : तालुक्यातील देवलमरी नजीकच्या कोत्तागुडम येथील रहिवासी आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुतन्ना पेंदाम (71 वर्ष) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. उच्च रक्तदाबामुळे अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना आधी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती खालावल्याने चंद्रपूरला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

मागील अनेक वर्षांपासून अहेरी येथे वास्तव्यास होते. गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन होण्यापूर्वी तत्कालीन चंद्रपूर जिल्हा परिषदेत व नंतर गडचिरोली जिल्हा परिषदेत असे चार वेळा मुतन्नाजी पेंदाम निवडून आले होते. यादरम्यान ते एकदा बांधकाम व आरोग्य सभापती होते.

रविवार सायंकाळी मूळगाव कोत्तागुडम येथील स्मशानभूमीत मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, डॉ.कन्ना मडावी, समता मडावी, माजी पंचायत समिती सदस्य रामेश्वररावबाबा आत्राम, श्रीकांत मद्दीवार, विलास बंडावार, डेव्हिड बोगी, नामदेव आत्राम, रियाज शेख, सुरेंद्र अलोने, रामचंद्र ढोलगे, सुल्तान पठाण, सोमाजी झाडे, नितीन दोंतूलवार, नागेश मडावी, पितांबर कुळमेथे यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुभवी व जाणकार नेता हरपला- धर्मरावबाबा

एका छोट्या गावातून येऊन मुतन्नाजी पेंदाम यांची राजकीय-सामाजिक जीवनात आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने एक अनुभवी आणि जाणकार नेता आपल्यातून हरपला, अशा शब्दात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. पेंदाम कुटुंबियांच्या दुःखात सहभाही असल्याचे त्यांनी शोकसंदेशात म्हटले.

काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी कोत्तागुडम येथे पेंदाम परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.