गावबंदीसह पोलिसांच्या सतर्कतेने यावर्षी नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह ठरला निष्प्रभ

गावकऱ्यांना लागले विकासाचे वेध

गडचिरोली : नक्षलवाद्यांची संघटना असलेल्या पिपल्स लिबरेशन गोरीला आर्मीच्या (पीएलजीए) स्थापना दिवसानिमित्त दरवर्षी 2 ते 8 डिसेंबरदरम्यान नक्षलवाद्यांकडून पाळला जाणारा नक्षल सप्ताह यावेळी निष्प्रभ ठरला. अतिसंवेदनशिल क्षेत्रातील 20 गावांमधील लोकांनी नक्षलवाद्यांना गावबंदी करत आता आम्हाला सुविधा द्या, गावाचा विकास करा, असे ठराव दिले. त्यामुळे नक्षलवाद्यांची कोंडी होऊन त्यांचे मनसुबे साध्य करणे शक्य झाले नाही.

माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये सन 2003 पासून नक्षल गावबंदी ही एक योजना आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अतिसंवेदनशिल गावांमधील नागरिकांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. त्यामुळे गेल्या काही महिन्यातच गडचिरोली जिल्हयातील 19 गावांनी माओवाद्यांना गावबंदीचा ठराव एकमताने संमत केला होता. त्यात नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहादरम्यान भामरागड उपविभागाअंतर्गत धोडराज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेनगुंडा येथे पोलीस दलामार्फत बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानुमते नक्षल गावबंदी करून त्याबाबतचा ठराव धोडराजच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सादर केला. तसेच मिडदापल्ली गावातील ग्रामस्थांनी आधीच माओवाद्यांना गावबंदीचा ठराव मंजूर केला.

रस्ते, पूल, शाळा, टॅावरच्या कामांना पाठिंबा

मिडदापल्लीच्या ग्रामस्थांनी रस्ते, शाळा, पुल आणि मोबाईल टॉवरच्या विकास कामांना आपला पाठिंबा दर्शवत पोलीस विभागाला सदर विकास कामांसाठी सहकार्य करण्याच्या ठरावावर एकमताने स्वाक्षरी केली. सदर बैठकीदरम्यान पोस्टे धोडराजचे प्रभारी अधिकारी यांनी ग्रामस्थांना मोबाईन टॉवर, रस्ते, पूल याविषयीचे महत्व पटवुन दिले. तसेच माओवाद्यांची भीती न बाळगता, त्यांच्या दमदाटीस न जुमानता आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करुन माओवाद्यांना कुठल्याही प्रकारची मदत न करण्याविषयी विश्वास पटवून दिला.

नक्षलवाद्यांना गावबंदी करणारी ही गावं गडचिरोली जिल्ह्राच्या शेवटच्या टोकावर असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा­या अबुझमाड परिसरालगत आहेत. त्यामुळे या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. जिल्हा व पोलीस प्रशासनालाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील नागरिक शासनाप्रती उदासीन होते. परंतू मागील तीन वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ.च्या माध्यमातून येथील गावक­ऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यात आल्याने गावक­यांचा विश्वास दृढ झाला आहे.

ग्रामस्थांनी बैठकीदरम्यान नक्षल गावबंदी व पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याबाबातचा ठराव संमत केला. यापुढे गावामार्फत माओवादी संघटनेस जेवन, राशन, पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करणार नाही, गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना माओवादी संघटनेत सहभागी होऊ देणार नाही असे ठरावात नमुद आहे.

या कार्यवाहीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते, धोडराज येथील प्रभारी अधिकारी अमोल सुर्यवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली.