गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा आज, दि.13 पासून सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर सुरू होणार आहेत. 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या क्रीडा संमेलनात प्रकल्पातील 41 आश्रमशाळांमधील सुमारे 1100 आदिवासी खेळाडू क्रीडा कौशल्य व नैपुण्यता दाखविणार आहेत.
क्रीडा संमेलनाचे उद्घाटन खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या हस्ते 13 डिसेंबरला सकाळी 10 वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे राहतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून आ.डॉ.मिलींद नरोटे, आ.रामदास मसराम, जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी मान्यवर राहणार आहेत.
या क्रीडा संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटमधील 24 शासकीय तर 17 अनुदानित अशा एकूण 41 आश्रमशाळेतील खेळाडू सहभाग घेणार आहेत. 14 , 17 व 19 वर्ष वयोगटात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक खेळांसह लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे या वैयक्तिक खेळांचेही आयोजन केले आहे.
क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्रकल्प अधिकारी वहीद शेख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी धनराज डबले, अनिल सोमनकर, डॉ.प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर , मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, समन्वयिका प्रमिला दहागावकर, संतोष कन्नाके, मुकेश गेडाम, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे आदींसह सुमारे 200 कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.