गडचिरोली : लांब पसरलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दूरच्या तालुकावासियांना वाहनाच्या लर्निंग आणि पर्मनंट लायसन्ससाठी आता जिल्हा मुख्यालयी येण्याची गरज नाही. नागरिकांच्या सुविधेसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची चमूच जिल्ह्यात देसाईगंज (वडसा), आलापल्ली आणि सिरोंचा येथे शिबिर घेऊन लायसन्सची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचणार आहे.
येत्या सोमवार, दि.16 डिसेंबरला वडसा येथे पहिले शिबिर होणार आहे. त्यानंतर दि.18 ला आलापल्ली येथे, तर दि.20 ला सिरोंचा येथे हे शिबिर होणार आहे. यात जे काम गडचिरोलीत जिल्हास्तरीय कार्यालयात केले जाते तेच काम तालुकास्तरावर केले जाणार आहे. त्यामुळे या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.