यश प्राप्तीनंतरही पाय जमिनीवरच, सामान्य माणूस हाच माझा कणा

सत्कारप्रसंगी आ.वडेट्टीवार यांचे भावोद्गार

गडचिरोली : सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून मी राजकीय वाटचालीस प्रारंभ केला. संघर्षानंतर सत्ता, यश प्राप्त झाले. पण सत्तेची गुर्मी कधी केली नाही. आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवले. सामान्य माणूस हाच माझा कणा आहे. त्यापुढे आपले राजकीय जीवन सर्वसामान्यांच्या कल्याणासाठीच वापरणार, असे भावपूर्ण मनोगत विधानसभेचे माजी विरोधीपक्ष नेते आ.विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

गडचिरोलीत गुरूवारी (दि.12) वाढदिवसाचे औचित्य साधून आ.विजय वडेट्टीवार, तसेच आरमोरीचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सत्कारानंतर ते आपले मनोगत व्यक्त करत होते.

याप्रसंगी आ.रामदास मसराम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी जि.प.उपाध्यक्ष जीवन नाट, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.कविता मोहरकर, अ‍ॅड.राम मेश्राम, हसनअली गिलानी, समशेरखान पठाण, वामनराव सावसाकडे , देवाजी सोनटक्के, पांडुरंग घोटेकर, हनमंतू मडावी, मनोज अग्रवाल, घनशाम वाढई, अब्दुल अझिझ पंजवाणी, सतीश विधाते, प्रा.शेषराव येलेकर, रोहीदास राऊत, चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद भगत, प्रतिक बारसिंगे आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आ.वडेट्टीवार यांनी जाती-धर्माच्या नावावर राजकारण करू नका, असे म्हणत जनआक्रोश मोर्चावर टिका केली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश प्राप्त झाल्यानंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही लक्षणीय यश मिळून सत्तास्थापनेपर्यंत पोहोचू अशी आशा होती. मात्र ईव्हीएममधील घोळामुळे ही अपेक्षा फलद्रुप झाली नाही, असे स्पष्ट केले. जगातील प्रगत देशातही बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात. यापुढे भारतातही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी जोर धरत असून राज्यातील ३० हजार गावातून ही मागणी पुढे आली असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 160 पेक्षा जास्त जागा जिंकुन पुन्हा सत्तेत येऊ, असा आशावादही आ.वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने आ.विजय वडेट्टीवार तसेच आ.रामदास मसराम यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. संचालन सतीश विधाते तर आभार रमेश चौधरी यांनी मानले.