
गडचिरोली : दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हाह:कार उडाला आहे. शेतात उभे असलेले धानपिक सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे आडवे झाले, तर कापणी करून ठेवलेल्या धानाच्या कडपा पाण्यात भिजल्या आहेत. त्यामुळे तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यासारखी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. यामुळे राजकीय नेत्यांनी या अस्मानी संकटाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देऊन दिलासा देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

या पावसामुळे खरीप हंगामातील धान, कापूस, सोयाबीन, तूर, मका अशा सर्वच पिकांना फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने कापणीचे काम ठप्प झाले असून शेतकऱ्यांचे सर्व श्रम आणि खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याची मागणी खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)चे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी ऐन धान कापणीच्या हंगामात हे अस्मानी संकट ओढवल्याने आणि जिल्ह्यात शेती हे उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. धानासोबत कापसाचे बोंड गळून पडले आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असल्याने सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी गण्यारपवार व इतर पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन पाठवून केली.
आरमोरी तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री तथा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून केली आहे. काही शेतकऱ्यांच्या कापलेल्या धानाच्या कडपा तीन दिवसांपासून पावसात असल्यामुळे त्याला अंकुर फुटत आहे. हातचे पीक वाया जाण्याची स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज व उसणवारी करून लावलेले पैसे फेडणे कठीण होणार आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या.
आरमोरी तालुक्यात शेतातील नुकसानीची पाहणी करताना कितीलाल पुराम, आनंदराव राऊत, विपील गोंदोळे, नामदेव गोंदोळे, नितीन सेलोकर, शरद मडावी, गणेश जांभुळे, प्रदीप सडमाके, नरेंद्र गजभिये, कार्तिक जांभुळे, कीर्तीलाल पुराम, खुशाल गोंदोळे, मच्छिन्द्र मेश्राम, सुनील कुमरे, यशवंत मानकर, आसाराम राऊत, राजू शेलोकर, महादेव खोब्रागडे, आशिक मने, लालाजी राऊत, नरेश बरडे, दिलीप मडपे, दीपक गोंदोळे, देवदास गोंदोळे, नानू कांबळे असे अनेक शेतकरी उपस्थित होते.
 
            
