अहेरी : अहेरी उपविभातील अहेरी, भामरागड, सिरोंचा आणि एटापल्ली या तालुक्यांमध्ये आठवडाभरापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्या आणि नाल्यांना मोठा पूर आला होता. या पुराचे पाणी काठालगतच्या शेतांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले. तब्बल तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचलेले असताना अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी कनिष्ठ अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना घेऊन छोट्या नावेने (डोंगा) पाणी भरलेल्या शेतांमध्ये फिरून नुकसानीचे अवलोकन केले.
अहेरी आणि सिरोंचा तालुक्यांमध्ये कापसाचीसुद्धा लागवड साडेनऊ हजार हेक्टर झालेली आहे. सततच्या पावसामुळे आणि शेतात पाणी तुंबल्यामुळे कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात बाधित झाले असल्याची माहिती मिळत होती. त्यामुळे शेतातील पीकांची परिस्थिती नेमकी कशी आहे, नुकसानीचे प्रमाण किती आहे हे पाहण्यासाठी अहेरीचे उपविभागीय कृषी अधिकारी गंजेवार आणि तालुका कृषी अधिकारी खरात यांच्यासह ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना घेऊन भाकरे यांनी प्राणहिता नदीलगतच्या मुदुंमतुरा या गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नुकसानीची पाहणी केली.
शेतामध्ये तीन ते चार फुटापर्यंत पाणी भरलेले होते. नाल्यावरील पुलावरही पाणी असल्यामुळे त्यावरून वाहतूक बंद होती. त्यामुळे या चमूने डोंग्यात बसून शेतांची पाहणी केली. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यासाठी आज शनिवारी चारही तालुक्यांची आढावा बैठक ठेवून कामाचे नियोजन केले जाणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी भाकरे यांनी सांगितले.