गडचिरोली : तालुक्यातील रानमुडझा या गावातील मामा तलावाची पाळ फुटून मोठ्या प्रमाणावर पाणी आणि मासे वाहात गेल्याने शेतकऱ्यांचे तथा मच्छीमार सोसायटीचे मोठे नुकसान झाले. गुरूवारी पहाटे ही घटना घडल्यानंतर दिवसभर पाणी वाहात होते. मात्र शुक्रवारी ‘कटाक्ष’ने वस्तुस्थिती मांडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत तलावाची फुटलेली पाळ रेतीचे पोते टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजवली. त्यामुळे शिल्लक असलेले थोडेफार पाणी वाचले. याशिवाय पुन्हा पावसाचे पडणारे पाणी तलावात साचू शकणार आहे.
गुरूवारी या घटनेनंतर माजी खा.अशोक नेते यांनी तलावावर जाऊन पाहणी केली होती. यावेळी गावकऱ्यांसह मच्छीमार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली व्यथा सांगितली. त्यानंतर नेते यांनी परिस्थितीची कल्पना जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. शुक्रवारी लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता ई.वाय.सीडाम, श्रीमती गोवरदीपे, ग्रामसेवक वायभासे व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तलाव फुटलेल्या ठिकाणी पुन्हा तात्पुरता बांध घालण्यात आला.
माजी जि.प.उपाध्यक्ष पोरेटी यांची भेट
माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी शुक्रवारी रानमुडझा येथे भेट देऊन गावकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी माजी पं.स.सदस्य नेताजी गावतुरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंत राऊत, हिरापूरचे सरपंच दिवाकर निसार, ठिवरू मेश्राम, परसराम गेडाम यांच्यासह गावकरी उपस्थित होते.