भेसळयुक्त दुधाच्या उत्पादनांमुळे होत आहे आरोग्यावर परिणाम, कारवाई करा

अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाचा दीर्घकाळ वापर केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. यामुळे पोट खराब होणे, उलट्या होणे, जुलाब, अॅलर्जी, किडनी, यकृत, हृदयाचे नुकसान, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आणि कर्करोग यांसारखे गंभीर आजार होतात. त्यामुळे कृत्रिम आणि भेसळयुक्त दुधाच्या उत्पादनात गुंतलेल्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत गडचिरोलीच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तथा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या उपायुक्तांकडे करण्यात आली.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही राष्ट्रीयस्तरावर कार्यरत असलेली स्वयंसेवी संस्था आहे. गेल्या 50 वर्षांपासून ही संस्था देशातील 400 हून अधिक जिल्ह्यांमध्ये ग्राहक जागृती, प्रशिक्षण आणि ग्राहकांच्या समस्या सोडविण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे. यावर्षी ही संस्था आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यरत आहे.

ग्राहक पंचायतने निवेदनात केलेल्या मागणीनुसार, जिल्ह्यात अन्न तपासणी मोबाईल व्हॅन असावी,
दूध आणि खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात यावी, ज्यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधीचाही समावेश करण्यात यावा, जिल्ह्यात प्रत्येक तहसीलस्तरावर नमुने तपासण्यासाठी प्रशासनाकडून एक “मोफत ओपन टेस्टिंग सेंटर” (खुले टेस्टिंग सेंटर) असावे, जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात अन्न निरीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरुन तातडीने कार्यवाही करता येईल, प्रशासनाने केलेल्या तपासणीअंती दुधात भेसळीचे प्रमाण आढळून आल्यावर त्याची सोशल मीडिया, वृत्तपत्रे आदींद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक जागरूक होतील. दूध भेसळीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि ज्या भागात ही भेसळ आढळून येईल त्या क्षेत्राच्या अधिकाऱ्यावरही कडक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी ग्राहक पंचायतने केली आहे. निवेदन सादर करताना जिल्हा सचिव उदय धकाते, अरुण पोगळे प्रामुख्याने उपस्थित होते.

(महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा वाचा खाली)