शेतकऱ्याची मुलगी झाली पोस्टमास्टर, गडचिरोलीच्या दुर्गम भागात सेवा

अभियांत्रिकीनंतर स्पर्धा परीक्षेत यश

गडचिरोली : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी युवा वर्ग रात्रीचा दिवस करून परिश्रम करत असतात. बरेच विद्यार्थी गावात राहून आपल्या कामाचा व्याप सांभाळूनही अभ्यास करतात. मात्र अनेकांना आपले गाव, घरदार सोडून शहराच्या ठिकाणी जाऊन अभ्यास करावा लागतो. या सगळ्या प्रकियेत मुलीही मागे नाहीत. स्पर्धा परीक्षेतून पोस्ट सेवेत रुजू झालेल्या वर्धा जिल्ह्याच्या एका हुनरबाज युवतीने चक्क राज्याच्या टोकावरच्या गडचिरोली जिल्ह्यातील, शेवटच्या सिरोंचा तालुक्यात सेवा सुरू केली आहे. तिला यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असले तरीही ती न डगमगता आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे.

पपिहा किशोर पजई असे त्या युवतीचे नाव आहे. वर्धेच्या न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनियर कॅालेजमधून 11, 12 वी झाल्यानंतर सावंगीतील महाविद्यालयातून तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ती पोस्ट सेवेत रुजू झाली. सिरोंचा तालुक्यातील रमेशगुडम येथे 2021 मध्ये तिला डाक सेवक म्हणून पोस्टिंग मिळाली.

पपिहाला एक बहीण एक लहान भाऊ आहे. तिचे वडील शेतकरी आहेत. सिरोंचा तालुक्यातील रमेशगुडम येथे नोकरीची आॅर्डर आल्यानंतर आपल्या मुलीला या नक्षलप्रभावित भागात पाठविणे मोठे जोखमीचे वाटत होते. पण पपिहाची जिद्दी आणि धैर्याने तिने हे क्षेत्र गाठून सेवा सुरू केली.

एक मुलगी रमेशगुडमसारख्या गावात पोस्टमास्टर म्हणून जबाबदारी सांभाळत असल्याचे पाहून ती परिसरात कौतुकाचा आणि प्रेरणेचा विषय झाली आहे. याबाबत पपिहाला विचारले असता तिने सांगितले, पावसाळ्यात नाल्यामध्ये पाणी भरून राहाते. रस्तेही बरोबर नाही. अशावेळी जीव मुठीत घेऊन आम्हाला कर्तव्य बजावण्यासाठी जावे लागते. एक मुलगी असतानाही मला बाईकवरून जाणे-येणे करावे लागते. घनदाट जंगलाच्या रस्त्याने जाण्यासाठी मोठी हिंमत पाहिजे.
पावसाळ्यात एका बाजूला रमेशगुडम नाला, तर दुसऱ्या बाजुला बिडरघाट नाला, तिसऱ्या बाजूला इंद्रावती नदी, अशा पध्दतीने हे गाव पाण्याने वेढलेले असते. गावातून बाहेर जाण्यासाठी नावेचा वापर करावा लागतो.

एकमेव टॅक्सीचा नागरिकांना आधार

या भागात चालणारी एकमेव खासगी टॅक्सी रमेशगुडमवरून चालते. या टॅक्सीने कर्जेलीवासीय तालुक्याच्या ठिकाणी सिरोंचा येथे येतात. या गावाला बारमाही रस्ता झाल्यास गावकरी मुख्य प्रवाहात येऊ शकतात. अविकसित आणि प्रगतीपासून दूर असलेल्या या गावात विकासाचा उजेड अद्याप पडलेला नाही. अशा विपरित परिस्थितीतही पपिहा आसरअल्ली, रमेशगुडम, कर्जेली गावातील लोक पोस्ट मास्टर पपिहा पजई यांना पूर्ण सहकार्य करतात.

रमेशगुडम गावात 3 वर्ष ग्रामीण डाकसेवक पदाची नोकरी करताना अनेक अडचणींवर मात करत पपिहाने पुढील परीक्षेचा अभ्यास केला. यासाठी आसरअल्ली तसेच रमेशगुडम येथील स्थानिकांनी वेळोवेळी अनेक प्रकारे तिला सहकार्य केले. याशिवाय वनविभाग व पोलिस स्टेशनकडून चालविल्या जाणाऱ्या वाचनालयातही तिने अभ्यास करत जिद्दीने यश मिळविले.

(महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा वाचा खाली)