पेसा क्षेत्रातील पदभरतीसाठी सुशिक्षित बेरोजगार आदिवासी संघटना रस्त्यावर

17 संवर्गातील भरती पूर्ववत करा

गडचिरोली : पेसा क्षेत्रात 17 संवर्गातील पदभरतीचा मार्ग मोकळा करून सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरीचा मार्ग तत्काळ मोकळा करा, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार आदिवासी संघटनेने केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मंगळवारी संध्याकाळी इंदिरा गांधी चौकात निदर्शने केली.

राज्यात तलाठी, वनरक्षक, शिक्षक आणि आरोग्य सेवक या पदांसाठी पैसा क्षेत्रातील भरतीची सर्व प्रक्रिया पार पडली, पण पेसा क्षेत्रातील उमेदवारांची अंतिम निवडसूची आणि नियुक्ती आदेश काढण्यात आलेला नाही. दुसरीकडे पेसा क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील उमेदवारांना नियुक्त्याही देण्यात आल्या आहेत. हा पेसा क्षेत्रातील उमेदवारांवर अन्याय असून तो तत्काळ दूर करा, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार आदिवासी संघटनेच्या सदस्यांनी केली.

जिल्हा परिषदेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पेसा भरतीचे चित्र यापेक्षाही विदारक आहे. आॅक्टोबर 2023 मध्ये पशुधन पर्यवेक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली, पण आतापर्यंत त्याचा निकाल जाहीर झालेला नाही. जि.प.अंतर्गत पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक, ग्रामसेवक या पदांची परीक्षा आतापर्यंत झालेली नाही. यामुळे बेरोजगार युवा वर्ग नैराश्यात जात आहे. त्यामुळे उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून मागण्या मान्य कराव्या अशी मागणी करण्यात आली.

या मागण्यांमध्ये पेसा भरतीचे नियुक्ती आदेश तात्काळ द्यावे, पशुधन पर्यवेक्षक व इतर परीक्षांचे निकाल व निवड यादी जाहीर करावी, आरोग्यसेवक पदाचे स्थगित झालेले नियुक्ती आदेश पूर्ववत करावे, वनरक्षक भरती नाॅनपेसा क्षेत्रासाठी दिलेल्या नियुक्तीच्या तारखेपासून गृहित धरावी, जि.प.अंतर्गत भरती परीक्षा पेसा व नॅान पेसा क्षेत्रासाठी एकाच वेळी घ्यावी, शिक्षक तसेच तलाठी निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावे आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांना पाठविण्यात आले.

निदर्शने करताना अ.भा.आ.वि.प.चे युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, आदिवासी एकता युवा समितीचे अध्यक्ष उमेश उईके, स्वप्निल मडावी, प्रवीण उसेंडी, समीर उसेंडी, राहुल हलामी, संजय गेडाम, रोशन नैताम, प्रशांत कुमरे, गायत्री नरोटे, कृपाली दुर्वा, नुतन वड्डे, नुतन पुसाली, माया पेंदाम, रविना आलाम, सावित्री उसेंडी, शिल्पा मन्नो, चेतना कन्नाके यांच्यासह अनेक युवक-युवती उपस्थित होते.