लखमापूर बोरी ग्रामपंचायतीमधील अनेक कामांत भ्रष्टाचार, सदस्याचा आरोप

सरपंच-सचिवाने संगनमतातून काढली बिले

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी ग्रामपंचायतमध्ये गेल्या दोन वर्षात सरपंच आणि सचिवाने संगनमत करून अनेक कामांत भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य अतुल बारसागडे यांनी येथे पत्रपरिषदेत केला. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली, पण त्याची दखल घेतल्या गेली नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

बारसागडे यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत 2022 ते 2024 या कालावधीत कोणताही ठराव किंवा टेंडर न करता आणि वस्तुंची खरेदी न करताच लाखो रुपयांची बिले उकळल्याचे म्हटले आहे. यात विशेषत: 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 2023 मध्ये झालेल्या 1 लाख 20 हजारांच्या कामासाठी 2 लाख 39 हजारांचे बिल काढले. मासागवर्गीय वस्तीत आणि लखमापूर गावात नवीन स्ट्रीट लाईट खरेदी न करता लाईट खरेदी केल्याचे दाखवून एकाच महिन्यात 2 लाख 80 हजार 900 रुपयांचे बिल काढले. पशुवैद्यकीय दवाखान्याचे सौर विद्युतीकरण न करता 2 लाखांचे बिल काढले. यावर्षी 1 लाख 16 हजार 400 रुपयांचे निकृ्ष्ट दर्जाचे फर्निचर खरेदी करून 2 लाख 69 हजार 300 रुपयांचे बिल काढल्याचा आरोप बारसागडे यांनी केला.

याचबरोबर ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातील पैशातही गैरव्यवहार झाला. कमी पैशात केलेली कामे जास्त पैशात दाखवून पैशाची उचल केल्या जात आहे. त्यामुळे ही गावकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे बारसागडे यांनी सांगितले. या लाखोंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी बारसागडे यांनी केली आहे.

सरपंच आणि सचिव संगनमताने हे सर्व व्यवहार करत असून सचिव रेकॅार्डही दाखवत नसल्याचे बारसागडे यांनी सांगितले. त्यामुळे या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अतुल बारसागडे यांनी केली आहे.