गडचिरोली : कृषी क्षेत्राचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी बियाणे, खते व कीटकनाशकांचा दर्जा चांगला असणे महत्वाचे असते. मात्र अनेक वेळा त्याची गुणवत्ता चांगली नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसतो. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचीच विक्री व्हावी यासाठी विविध कायद्याचे संरक्षणही दिलेले आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते किंवा कीटकनाशकांची खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते.
बियाणे खरेदी करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी
बनावट / भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करा, पावतीवर बियाण्यांचा संपूर्ण तपशिल, जसे पीक, वाण, संपुर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी नमुद करावे, रोख किंवा उधारीची पावती घ्यावी, खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे, खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी, बियाण्याची निवड हि जमीन व ओलीताची साधने लक्षात घेऊन करावी, भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे सिलबंद / मोहोरबंद असल्याची खात्री करा, बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्या, कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा, खरेदी करताना पक्की पावती घेऊन त्यावर बियाण्याचा प्रकार, लॉट क्रमांक, पॅकिंग किती वजनाची आहे, पॅकिंगची तारीख, वापरण्याची अंतिम तारीख इत्यादी गोष्टी नमूद केल्या आहेत का ते पहावे, बाजारात सिलबंद बियाण्याच्या पिशवीवर प्रमाणित बियाण्याच्या पिशवीला दोन टॅग असतात. अशा निळ्या रंगाचा डबल लेबल पाहूनच प्रमाणित बियाणे खरेदी करावे, प्रमाणित बियाण्याची पिशवी तिन्ही बाजूने आतून व्यवस्थित शिवलेली आहे का ते पहावे व बियाण्याची पिशवी शिलाईच्या बाजूने न फोडता त्याच्या विरुद्ध बाजूने फोडावी, शेतकऱ्यांनी बियाण्याच्या तक्रारीबाबत सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात संबंधित तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी अथवा कृषि अधिकारी पंचायत समिती यांचेकडे अर्ज सादर करावा, कमी अंकुरणाबाबतची तक्रार पेरणी केल्यापासून 10 दिवसांच्या आत कृषि विभागाकडे दाखल करावी, बियाणे उत्पादकाने केलेल्या दाव्याविरुध्द किड पडण्याच्या व रोग होण्याच्या शक्यतेसंबंधीची तक्रार अशी घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ दाखल करावी, जनुकीय अशुध्दतेच्या बाबतीतील तक्रार पिक 50 टक्के फुलोरा अवस्थेत आल्याच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत किंवा योग्य टप्प्यावर दाखल करावी, असे कृषी विभागाच्या वतीने सुचविण्यात आले आहे.