चामोर्शीतील निरंकारी मंडळाच्या शिबिरात एकाच ठिकाणी 86 युनिट रक्तसंकलन

या पुण्यकर्माचा लाभ मिळतो- नागदेवे

चामोर्शी : संत निरंकारी मंडळाच्या चामोर्शी शाखेद्वारे संत निरंकारी सत्संग भवन चामोर्शी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात 85 पुरूष आणि एका महिलेसह एकूण 86 युनिट रक्त संकलन झाले.

या शिबिराचे उ‌द्घाटन आमदार डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते, झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, जीवनकला बोरकुटे, मुखी, आष्टी, कन्हैय्यालाल डैमानी, डॉ.अंजली साखरे, डॉ.श्रीमती शेख, अजय ठाकरे, अशोक बोरकुटे, रा.चामोर्शी आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

अध्यक्षीय मार्गदर्शनात किशन नागदेवे यांनी रक्तदान हे पूण्यकर्म असून याचा लाभ रक्तदात्याला परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात देतो, असे सांगितले. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी विभागाने रक्ताची टंचाई असल्याचे संत निरंकारी मंडळाला रक्तदान शिबीरासाठी विनंती केली होती. मंडळाने दि.28 ऑगस्टला मालेवाडा, तर 1 सप्टेंबरला चामोर्शी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात चामोर्शी येथे 86 दात्यांनी रक्तदान केले.

आतापर्यंत 13 लाखापेक्षा अधिक युनिट जमा

संत निरंकारी मंडळ ही रक्दानामध्ये विश्वात अग्रणी संस्था आहे. आजपावेतो रक्तदान शिबिरांद्वारे या मंडळाने 13 लाखांपेक्षा अधिक युनिट रक्तदान करण्यात आले आहे. है सेवाकार्य अविरतपणे सुरू आहे. या रक्तदान शिबिरासाठी रक्तपेढी, जिल्हा रूग्णालय गडचिरोली येथील डॉक्टर व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले. शिबीराला यशस्वी करण्यासाठी चामोर्शी शाखेचे सेवादल संचालक भोजराज लंजे, शिक्षक फुलचंद गेडाम, तसेच सर्व महिला-पुरुष व सेवादलांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अशोक बोरकुटे यांनी, संचालन अश्विनी गव्हारे तर आभार प्रदर्शन विद्या बोरकुटे यांनी केले.