सती नदीवरील पुलाचे बंद पडलेले बांधकाम दोन महिन्यानंतर पुन्हा सुरू

आ.गजबेंच्या समन्वयाने तांत्रिक अडचण दूर

कुरखेडा : कुरखेडा-कोरची मार्गावर शहरालगत असलेल्या सती नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम तांत्रिक अडचणीमुळे मागील 2 महिन्यांपासून बंद होते. आ.गजबे यांनी हे काम लवकर मार्गी लागण्यासाठी व्हिडीओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत चर्चा केली आणि निर्माण झालेली तांत्रिक अडचण दूर करण्यात महत्वाची भूमिका बजावली. यामुळे दोन महिन्यांपासून बंद असलेले सदर पूलाचे बांधकाम पुन्हा सुरू झाले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या पुलाअभावी पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद पडत होती. या क्षेत्राचे आमदार गजबे यांनी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करत हा पूल मंजूर केला. नागपूर ते रायपूर मार्गावर नवीन राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत सध्या ब्रम्हपूरी ते वडसा, कुरखेडा, कोरची या मार्गाचे रूंदीकरण, मजबूतीकरण तसेच या मार्गातील पुलांचे नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. याअंतर्गत कुरखेडाजवळ सती नदीवरील जुन्या पुलाला तोडत त्याच ठिकाणी उंच व मजबूत नवीन पुलाच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली होती.

पर्यायी वनीकरणासाठी ही होती तांत्रिक अडचण

सदर बांधकाम हे वनविभागाचा जमिनीवर असल्याने 4.98 हेक्टर आर जागा वनविभागाकडून वळती करून घेण्याकरीता प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे पर्यायी वनीकरणाकरीता 31 मार्च 2024 रोजी 27 लाख 99 हजार 27 रुपयांचा भरणा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वडसा वनविभागाकडे करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र या खात्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे रक्कम जमा करता आली नाही. या तांत्रिक अडचणीमुळे सदर बांधकाम बंद होते.

तर पावसाळ्यात निर्माण होईल मोठी अडचण

सती नदीवरील हा पूल अत्यंत महत्वाचा आहे. कुरखेडा ते कोरची, मालेवाडा, वैरागड या प्रमुख गावांना, तसेच नदी पलीकडील अनेक लहान खेड्यांना या पुलाने तालुका मुख्यालयाशी जोडलेले आहे. सद्या बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या बाजूने कच्चा रपटा तयार करीत वाहतूक सुरू आहे, मात्र हा कच्चा रपटा पावसाळ्यात वाहून जाण्याची दाट शक्यता असल्याने नवीन पूलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे या नवीन पुलाचे बांधकाम यूद्धपातळीवर पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी आ.गजबे यांनी पुढाकार घेत मुख्य वनसंरक्षक गडचिरोली, उपवनसंरक्षक वडसा तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संयुक्त व्हिडीओ कॅान्फरन्स बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मंगळवारी प्रत्यक्ष भेट देत बांधकामाची पाहणी केली.

(महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा पहा खाली)