गडचिरोली : जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाल्यावर पूल नसल्याने या भागातील नागरिकांना होणारा त्रास आता बंद होणार आहे. आलापल्ली-भामरागड- लाहेरी-गुंडेनूर-बिनागुंडा-कुवाकोडी ते राज्य सीमा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३० डी येतो. या मार्गावर गुंडेनूर नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरु आहे. यात ८ पायव्याचे काम पूर्ण झालेले असून उर्वरित ६ पायव्याचे काम प्रगतीपथावर आहे.
या प्रकल्पांतर्गत गुंडेनूर नाल्यावर १४० मीटर लांबीचे २ पूल व १६४४ मीटर लांबीचा जोडरस्ता समाविष्ट आहे. हा प्रकल्प मे २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांनी दिली. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण झाल्यास पुढच्या पावसाळ्यात या पुलावरून नागरिकांना जाता येणार आहे.
जिल्ह्याच्या पुर्वेकडील तालुके वनव्याप्त असून भामरागड, टिपागड, पळसगड व सुरजागड हा भाग डोंगराळ आहे. तसेच जिल्ह्यात गोदावरी, वैनगंगा, प्राणहिता, पर्लकोटा, इंद्रावती इत्यादी प्रमुख नद्या आहेत. शिवाय बऱ्याच उपनद्या व नाले आहेत. अशा भौगोलिक परिस्थितीत येथील लोकसंख्या विखुरलेली आहे. त्यामुळे विशेषतः पावसाळ्यात दळणवळणाची समस्या उद्भवते. याकडे शासनाचे विशेष लक्ष असून जीर्ण रस्ते व पूल यांची दुरुस्ती करणे व नवीन रस्ते व पूल बांधणे याबाबत शासन सजग असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले.
रस्त्यांच्या व नद्या/नाल्यांच्या अडचणीमुळे येथील जनतेस होणारा त्रास दूर करणे, क्वचित प्रसंगी होणारे मृत्यू टाळणे याबाबत शासन कटीबद्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिली. रस्त्यांचे व पुलांचे बांधकाम शीघ्र गतीने पूर्ण करण्याकरीता जिल्हा प्रशासन तत्पर असून प्रकल्प राबविताना येणारे विविध स्तरावरील अडथळे संबंधित विभागांकडून दूर करण्यासाठी सर्व प्रयत्न केल्या जात आहेत.