बांडे नदीवर बांधला पूल, पण जाण्यासाठी रस्ताच नाही

पीएमजीएसवाय विभागाचा अजब कारभार

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांच्या सुविधांसाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जात असले तरी काही अधिकाऱ्यांच्या खाऊ वृत्तीमुळे योजनांची वाट लागत आहे. याचा अनुभव सध्या भामरागड तालुक्यातील नागरिक घेत आहेत. या तालुक्यातील बांडे नदीवर कांदोळी येथे पुलाचे काम करण्यात आले. पण पुलाच्या दोन्ही बाजुने पक्का रस्ताच बनविला नाही. त्यामुळे भामरागडवरून २५ किलोमीटरचा फेरा घालून नागरिकांना कांदोळीला जावे लागत आहे.

यावर्षीच्या पावसामुळे पुलाच्या दोन्ही बाजुने टाकलेली माती वाहून गेली आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बनविलेल्या या कामाचे पितळ उघडे पडले. जवळपास तीन वर्षापूर्वी हे काम सुरू झाले होते. मे अखेर या पुलाचे काम पूर्ण झाले. पावसाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पुलाच्या दोन्ही बाजुला गिट्टी टाकून पक्का रस्ता बनविणे गरजेचे होते. पण संबंधित कंत्राटदाराने कंजुषी केली. संबंधित अधिकाऱ्यानेही दुर्लक्ष केले. आज त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे. या पुलापासून कांदोळी अवघ्या २ किलोमीटरवर आहे, पण पुलावरून जाणे शक्य नसल्यामुळे पेरमिलीमार्गे २५ किलोमीटरचा फेरा घालून जावे लागत आहे.