हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

एक लाखापर्यंत नुकसानभरपाई द्या

गडचिरोली : जिल्हातील बहुसंख्य नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर होत असताना मागील तीन वर्षांपासून परराज्यातून आलेल्या रानटी हत्तींनी धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे या हत्तींचा कायस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्य वनसंरक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आरमोरीचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड.विश्वजित कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष परसराम टिकले, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, शिवाजी नरोटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. सोबतच नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम 50 हजाराहून 1 लाख रुपयापर्यंत वाढ करण्याची मागणी आमदार मसराम यांनी केली आहे. या संदर्भात विधानभवनातही आवाज उचलणार असल्याचे आ.मसराम यांनी सांगितले.

यावर्षी खरीप हंगामाचे पिक निघालेले असताना रानटी हत्तींनी जिल्ह्यात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत आहेत. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढून जंगली हत्तींच्या त्रासापासून शेतकऱ्यांना कायमचे मुक्त करावे, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.