गडचिरोली : चातगाव वनपरिक्षेत्रात येणाऱ्या गडचिरोली तालुक्यातील कुरखेडा गावालगतच्या शेतात एका गर्भवती महिलेवर वाघाने हल्ला करत तिला ठार केले. शारदा महेश मानकर (26 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या शारदाला 3 वर्षांचा मुलगा आहे.
गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगलालगतच्या शेतात ती धान गोळा करण्यासाठी गेली होती. धानाची मळणी आटोपल्यानंतर खळ्यावर शिल्लक राहिलेले धान गोळा करून त्यातील कचरा साफ करत असताना झुडूपात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या शेतातील महिला धावून आल्य, पण तोपर्यंत शारदाचे प्राण घेऊन वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली होती.
चातगाव वनपरिक्षेत्रातील कुरखेडा परिसरात वाघाचा वावर आहे. त्यामुळे लगतच्या गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.