जिल्हा क्रीडा संकुलाच्या निधीसाठी काँग्रेस सोमवारी करणार भीक मांगो आंदोलन

खेळाडूंसह पोलिस भरतीच्या युवकांना त्रास

गडचिरोली : गडचिरोलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेवर निर्माण केल्या जाणाऱ्या विविध कामांसाठी राज्य सरकार निधी देत नसल्यामुळे हे काम अर्धवट अवस्थेत पडले आहे. त्याचा निषेध म्हणून याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (दि.८) सायंकाळी ४ वाजता जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेवर भिक मांगो आंदोलन केले जाणार आहे.

जिल्ह्यातील खेळाडू आणि पोलिस, वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना अत्याधुनिक जिल्हा क्रीडा संकुल असावे, या उद्देशाने महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना भरीव निधी देऊन क्रीडा संकुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. मात्र शिंदे-भाजप सरकार सत्तेत आल्यापासून क्रीडा स्टेडिअमच्या कामास नियमित निधी दिल्या जात नसल्याने स्टेडियमचे काम रखडले आहे. त्यामुळे अनेक खेळाडू आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना त्रास होत आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला लवकरात लवकर भरीव निधी देऊन सरकारने तातडीने क्रीडा संकुलाचे काम करावे या मागणीला घेऊन, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘भिख मांगो आंदोलन’ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.