खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून आंधळीत स्कूल बसचा लोकार्पण सोहळा

आदिवासी विद्यार्थ्यांना देणार मोफत लाभ

कुरखेडा : बहुजन हिताय शिक्षण संस्था कुरखेडाद्वारा संचालित तालुक्यातील आव्हान विद्यालय तथा जुनिअर कॉलेज आंधळी (फाटा) यांना खा.अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून स्कूल बस देण्यात आली. २२ लाख ५० हजार रुपये किमतीच्या या बसचे लोकार्पण खासदार नेते यांच्या हस्ते करण्यात आले. वार्षिक स्नेहसंम्मेलन व पालक मेळाव्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या ३६ सिटर स्कूल बसमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न घेता त्यांना मोफत बससेवा उपलब्ध करून दिली जात असल्याबद्दल खा.नेते यांनी संस्थेचे सचिव कृपाल मेश्राम आणि शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी सदर स्कूल बसकरिता २२ लक्ष ५० हजार रुपये खासदार निधीतून उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेमार्फत खासदार अशोक नेते यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनवाने, प्राचार्य महेश खुणे, जनार्धन मस्के, किशोर मेश्राम, चारुलता वालदे, प्रा.राकेश राऊत, प्रा.राजेंद्र पिसे, प्रकाश हजारे, निखिल डोर्लीकर, तुषार फुले, शुभम लांजेवार, नरेंद्र कोसे, विलास भानारकर यांनी सहकार्य केले.