अहेरी : तालुक्यातील अनेक रेव्हेन्यू इन्स्पेक्टर, अर्थात महसूल निरीक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे एका निरीक्षकाकडे दोन ते तीन ठिकाणचा प्रभार आहे. यातील काही वैयक्तिक स्वार्थासाठी कंत्राटदारांना टार्गेट करत असून सामान्य नागरिकांची कामे करण्याऐवजी मुरूमाचे खड्डे मोजण्यातच त्यांना जास्त स्वारस्य असल्याचे दिसून येत आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भागात अनेक मुलभूत सुविधांची कामे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे अहेरी तालुक्यातील विकास कामे झपाट्याने होत आहेत. मात्र काही महसूल निरीक्षक दुर्गम भागातील नागरिकांच्या सोयी-सुविधांचा विचार न करता कंत्राटदारांनी मुरूम कुठून काढला हे शोधण्यातच जास्त व्यस्त असतात. विशेष म्हणजे रॅायल्टीच्या माध्यमातून अधिकृतपणे मुरूम काढून नेला जात असतानाही महसूल निरीक्षक हेकेखोरपणे वागत असल्याने कंत्राटदार कंटाळले आहेत. प्रत्येक रस्त्याच्या कामावर जाऊन कंत्राटदाराला त्रास देणे हे एका महसूल निरीक्षकाचे नित्याचेच काम झाले आहे. अशा कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.