बंगलोरच्या अजीम प्रेमजी फाउंडेशनची टिम पोहोचली नगरीच्या जि.प.शाळेत

उपक्रमशील योजनांची माहिती घेतली जाणून

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नगरी येथील शाळेत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती प्रसिद्ध उद्योगपती अजीम प्रेमजी यांच्या बंगलोर येथील फाउंडेशनपर्यंत पोहोचली आहे. या फाऊंडेशनच्या टिमने मंगळवारी (दि.28) नगरीच्या या शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन उपक्रमशिल योजनांची माहिती जाणून घेतली.

सकाळी ठीक 9 वाजता फाउंडेशन टीममधील सदस्य विजयी दास, विकास राय यांच्यासह जि.प.चे शिक्षण विस्तार अधिकारी अजमेरा, सर्वशिक्षा अभियान अपंग सेलचे हुकरे यांनी शाळेला भेट दिली.

गडचिरोली तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा आणि काटलीचे केंद्र प्रमुख रवी मुलकलवार यांच्या मार्गदर्शनातून मुलांच्या रोज चालणाऱ्या अॅक्टिव्हिटीज, साप्ताहिक योजना, विविध उपक्रम याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. प्रत्यक्ष शिक्षक आणि पालकांसह विद्यार्थ्यासोबतही टीमच्या प्रमुखांनी संवाद साधत माहिती मिळवली. चांगल्या उपक्रमांबाबत मार्गदर्शनही केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम चांगल्या प्रकारे उपयोगी होत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेला सु्ट्या असतानाही सर्व शिक्षक दररोज सदर उपक्रम राबविण्यासाठी शाळेत उपस्थित राहात असल्याबाबत, परिसर स्वच्छतेबाबत टिमच्या सदस्यांनी कौतुक केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजू घुगरे, विषय शिक्षिका सुषमा मडावी, शिक्षिका हर्षलता कुमरे, शाळा समितीचे सभापती राजू नैताम आणि ज्यांच्या सौजन्याने या शाळेमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे त्या मॅजिक बस फाउंडेशनचे तालुका समन्वयक लेखाराम हुलके हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.