गडचिरोली : उन्हाळा आता शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तयारीचे वेध लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांच्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंग याबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. नियंत्रण कक्ष 15 मे ते 25 ऑगस्ट यादरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहील. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात, तसेच तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना तक्रार नोंदविता येईल. तसेच बोगस खते, बियाणे विक्री होत असल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
नियंत्रण कक्षात तक्रारीकरीता 9404535481 या क्रमांकावर किंवा 07132-222593, 07132-222312 तसेच टोल फ्री क्रमांक 1800233400 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल.
शेतकऱ्यांना कोणत्या तक्रारी करता येणार?
बोगस बियाणे, खते, कीटकनाशके, लिंकिंग, ज्यादा दराने विक्री, बिलाची पक्की पावती न देणे इत्यादी.
निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय करावे?
परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे, पक्के बिल घ्यावे, बिलावर दुकानाचे नाव, लॉट नंबर, खरेदीदाराचे नाव, विक्रीची किंमत, अंतिम मुदत असल्याची खात्री करून घ्यावी, पावतीवर शेतकऱ्याची सही व अंगठा तसेच विक्रेत्याची सही व शिक्का असावा, कच्चे बिल स्विकारू नये. पक्क्या बिलाचा आग्रह करावा, हंगाम संपेपर्यंत बिल जपुन ठेवावे, पेरणीसाठी पिशवी फोडताना खालील बाजूने फोडावी, व पिशवीला असलेले टॅग व लेबल जपून ठेवावे.
शेतकऱ्यांनी काय करू नये?
फेरीवाले, विक्रते (घरपोच सेवा देणारे ) यांच्याकडून बी-बियाणे, खते व कीटकनाशक यांची खरेदी करू नये, कोणत्याही परिस्थितीत छापील किमतीपेक्षा अधिक दराने बियाणे, खते खरेदी करू नये, विक्रेते जबरदस्ती करत असल्यास त्वरित 8698389773 या व्हॅाट्सप क्र. वर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांनी केले आहे.