देसाईगंज : उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात दोन आठवडे अवकाळी पावसाने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. अशातच शासकीय खरेदी केंद्रावरून मका खरेदी सुरु करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदु लागला होता. ही बाब लक्षात घेता आमदार कृष्णा गजबे यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून यथाशिघ्र मका खरेदी करण्याची विनंती केली. अखेर ४ मे पासून मका खरेदी संदर्भात राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा मका खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.
किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२२-२३ मध्ये भरडधान्य खरेदी कार्यान्वित करणे, खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे व अभिकर्ता संस्थांना खरेदीचे उद्दिष्ट नेमून देण्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने ३ मे २०२३ रोजीच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशीत करण्यात आले आहे.केंद्र शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार पणन हंगाम २०२२-२३ रब्बी मध्ये मका, ज्वारी खरेदीसाठी अभिकर्ता संस्था मार्केटिंग फेडरेशनला ६ लाख क्विंटल मका, १ लाख ३६ हजार क्विंटल ज्वारी तर आदिवासी विकास महामंडळाला ३२ हजार क्विंटल मका व ३३ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
अभिकर्ता संस्थांना ३० जुन २०२३ पर्यंत खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शासन निर्णयान्वये राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२२-२३ रब्बी मध्ये धान, भरडधान्य खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित अभिकर्ता संस्थांकडून प्राप्त माहितीनुसार, पणन हंगाम २०२२-२३ रब्बी मध्ये राज्यात भरडधान्य खरेदीचा सुधारीत आराखडा केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.त्यास केंद्र शासनाने मान्यता देऊनही खरेदीस विलंब होत असल्याचे पाहु जाता आमदार गजबे यांनी २ मे २०२३ रोजी शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती अवगत करुन दिली होती. त्या अनुषंगाने राज्य शासनाने मका खरेदीचे निर्देश दिले आहे.